Rajhans Podcasts
Done That Been There | Meghana Pethe
हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'... डंदॅट् बींदेअर् या आपल्या नवीन पुस्तकातील काही निवडक भाग सादर करताहेत लेखिका मेघना पेठे
काश्मिरियत
काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी ‘मेहमाननवाजी’ करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा
धुळाक्षरे ते शल्यकौशल्य
त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...