WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Testimonials

स्मिता घुले मोराळे

आमची कहाणी आपली कहाणी

नुकतच पुस्तक वाचून झालं...तुमचे सगळे अनुभव इतके  वास्तव आहेत..जणू काही आपल्या मनात जे सुरू आहे

अगदी तेच तुम्ही लिहून काढलं आहे...आपली नवीन ठिकाणी होणारी बदली..मनाची होणारी
उलाघाल..मुलाना आणि  स्वतःला त्या ठिकाणी जुळवून घेणं...नवीन लोकांशी जुळवून घेणं..स्थानिक
राजकारण.. तिथली सर्व बर्‍या वाईट प्रवृत्तीची लोकं..स्थानिक भाषा..खात्यात येणारे अनुभव हे सगळे relate
करू शकते...प्रत्येक  अधिकाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे पण इतर क्षेत्रातील
लोकांना  राजकारण प्रशासन कसं एकमेकांशी जोडलेले आहे आणि कुटुंबीयांना सतत अशा बदलत्या जागांमध्ये
जुळवून घेणं किती अवघड आहे.. तारेवरची कसरत आहे हे ही समजेल...तुमच्या मनातले सगळे सल मग ते
पतीच्या कामाच्या व्यस्ततेमुळे असो..की लोकाना मदत करून ही त्यांच्याकडून आलेले कटू अनुभव असोत
की आपले रहाणे वागणे विचार करणे हे तत्त्वाशी सतत तावून सुलाखून घेणे असो..तुमच्या संवेदनशील
मनातील ही सगळी आंदोलनं वाचकांच्या मनात तितक्याच प्रखरतेने पोहोचतात...तुम्ही लिहिलं आहे तसं
आपले लोकानी दिलेले अनुभव हेच खरे मार्गदर्शक मानायचे...हे सगळे अनुभव इतक्या स्वच्छ
पणे..प्रामाणिकपणे..तळमळीने लिहिले आहेत तरीही वाचताना खूप सहज ओघवते  वाटतात..समाजात
असणार्‍या सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांची वर्गवारी  अगदी खरी आहे..आता खात्यात असणारे किंवा येऊ
इच्छिणारे अशा सगळ्या  अधिकार्‍यांनी तर हे पुस्तक वाचायलाच हवे..ज्यामुळे सत्तेच्या प्रवाहात वाहवत
न जाता आपण आपली एक तत्त्वांची चौकट तरी करून घेतली पाहिजे हे त्यांना जाणवेल..सर्व
अधिकाऱ्यांसाठी जणु दीपस्तंभाचे काम करणारे खूप सुंदर  लिखाण केले आहे.. तुमचे अनुभव आणि त्यांचं
तुम्ही केलेलं विश्लेषण तुमच्या बुद्धिमान , अभ्यासू आणि संवेदनशील मनाची साक्ष देते..पुस्तक वाचून
एखाद्या मैत्रिणीला भेटून मनातले सगळे विचार सल  सुख दुःख वाटून घेतल्यासारखं वाटलं.. माझ्या
माहेरची आणि मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणुन तुमचं अजूनच कौतुक
आणि अभिमान वाटतो..पुढेही असेच लिखाण आमच्यासारख्या वाचकाना  वाचायला  आवडेल!!

प्रतिमा कुलकर्णी

ज्येष्ठ दिग्दर्शिका,  लेखिका, अभिनेत्री  प्रतिमा कुलकर्णी यांची माझ्या 'क्लोज एंकाउंटर्स ' या पुस्तकावर अतिशय संवेदनशील प्रतिक्रिया.. 

पुरू,

काल रात्री पुस्तक वाचून संपवलं. तू पाठवल्यावर लगेच सुरू केलं आणि भराभर वाचतही गेले, पण अचानक काही काम सुरू झालं आणि खंड पडला. राजम्मा पर्यंत येऊन खंड पडला होता. फार विषण्ण वाटत होतं. कदाचित म्हणूनच पटकन परत जाणं झालं नसाव. असो.

तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. तुझ्या पुस्तकाने.मला एका वेगळ्या आणि अनोळखी जगाची सफर घडवून आणली. त्याबद्दल तुझे खूप आभार. पुस्तक वाचून, नाटक बघून जगात अनेक प्रकारची माणसं आणि त्यांची अनेक प्रकारची आयुष्य असतात हे माहीत होते पण इतक्या जवळून नाही. इतक्या अंगांनी तर नाहीच.

पुस्तक फार सुंदर आहे असं म्हणवत नाही, तरीही ते तसं आहेच.

अस्सल, जिवंत माणसांचं जिवंत चित्रण आहे त्यात. फार प्रेमानी लिहिलं आहेस तू.  तुझी भाषा, शैली ही उत्तम आहेच, पण त्याही पेक्षा तुझी दृष्टी कमाल आहे.

ही सगळी माणसं तू लहानपणी पाहिली आहेस. तरीही त्या वयातही तुला त्यांचं मन कसं काय कळत होतं? आयुष्यात त्यांची नेमकी घालमेल काय आहे, विचार, भावना, आकांक्षा काय आहेत हे कसं काय कळत होतं? आणि नेमकं ते पकडुन तू इतक्या वर्षांनी त्यांच्या बद्दल कसं काय लिहू शकलास? प्रेम हे एक कारण आहेच, empathy हे आणखी एक कारण.

उत्तम लेखक व्हायला आणि काय लागतं?

ह्या पुस्तकाचा अभ्यास व्हायला हवा.

जयंत महणाला आहे तसं मला सारे प्रवासी घडीचे ची आठवण झाली. व्यक्ती आणि वल्ली आणि सारे प्रवासी घडीचे ही सगळ्यांचीच आवडती पुस्तकं आहेत.

पण तुझ्या पुस्तकात त्यांचं मन जसं दिसतं, त्यानी मला जास्त ढवळून  काढलं.

तू लेखी उत्तर दे महणालास ते बरच झालं. नुसतं बोलून समाधान झालं नसतं माझंही.

अशीच आणखी अनेक पुस्तकं तुझ्या हातून लिहून होवोत आणि आम्हाला आयुष्याचं दर्शन पुन:पुन्हा होत राहो ही सदिच्छा!!

सुखदेव पाटील

पिढीजात : आखीवरेखीव वाटा टाळून निर्मिलेली अजरामर कलाकृती.

स्नेही श्रीकांत देशमुख यांनी आपल्या 'पिढीजात'या थोरामोठ्यांकडून बहुवाचित, बहुचर्चित, 

बहुसमिक्षित कांदबरीतून येथील सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेची 'पिढीजात' वर्तणूक कशी शोषक स्वरूपाचीच आहे, याचे आपल्या लेखणीतून त्यांच्या स्वानुभवातील अनुभवकथन केलेले आहेत. त्यामुळे ही कादंबरी काल्पनिक कथानकाधारीत 

नसून वास्तवाधारीत आहे हे नक्की ! 

कोणताही लेखक कोणतीही साहित्यकृती केवळ कल्पनेवर आरूढ होऊन लिहूच शकत नाही. स्वानुभवाच्या धाग्यांची गुंफण त्यात असतेच, हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये.

श्रीकांत देशमुख हे माझे सहकर्मी मित्र म्हणून त्यांचे सर्व अनुभव आमच्यासारख्या सहकर्मींच्या पाहणीतले, स्वानुभवातले आणि म्हणून मनाला थेट भिडणारे आहेत.

कादंबरीकाराने वाचकांच्याच वास्तव आयुष्याचे, घटनांचेच चित्र जसेच्या तसे रेखाटले आहे, असे वाटावे इतकी या कादंबरीतील मांडणी वाचकाला जवळची वाटणारी आहे.

सहकार क्षेत्र हे राजकारणगर्भित असले तरी 'पिढीजात'चा नायक नवनाथ शेळके यास राजकीयपेक्षा

प्रशासकीय व्यवस्थेने केलेले विषाक्त दंश अधिक खोल व दिर्घ परिणाम करणारे असल्याची अनुभूती या कादंबरीच्या वाचनातून येते. 

ही कादंबरी पृष्ठसंख्येने (६०४) मोठी वाटत असली तरी प्रत्यक्ष वाचताना ती तशी जाणवत नाही. पानोपानी वाचकाची उत्सुकता वाढवत जाणारी, लेखनाच्या पारंपरिक 'पिढीजात' आखीवरेखीव वाटा सोडून निर्मिलेली अशी ही एक अजरामर व 'पिढीजात' सतत वाचली जात राहणारी अशी साहित्यकृती आहे.

श्रीकांत देशमुख यांनी आपल्या कादंबरीतून नुसते कथानकच मांडलेले नसून येथील संपूर्ण सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेची शल्यचिकित्सा/चिरफाड करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून माणूस माणसाकडूनच कोणत्या थरापर्यंत पिळला/गिळला जाऊ शकतो याचा 'ऑंखो देखा हाल' मांडत येथील 'कल्याणकारी' राज्यव्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेतील 'झारीतले…..' कसे, तिचा स्वहितासाठी वापर करतात, या अनुषंगाने कांही महत्वाचे चिंतनीय प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे येथील व्यवस्थेने,खास करून प्रशासकीय व्यवस्थेने आत्मचिंतन करून देणे अपेक्षित आहे.

वाचकांना प्रश्नांकित करून सोडणे, हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आणि कादंबरीकार स्नेही श्रीकांत देशमुख यांचे

एक दमदार साहित्यीक म्हणून यश आहे!

त्यांच्या या क्षेत्रातील भावी कलाकृती व निरंतर यश संपादनासाठी त्यांना स्नेहपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!

योगेश भुसे

मराठीतील प्रवासवर्णनांच्या नेहमीच्या पायवाटा सोडून अनवट वाटांवरील अनेक अनोळखी जागा, व्यक्ती आणि गांवे यांची खास कुबेर शैलीत खुमासदार ओळख करून देणारे हे वाचनीय पुस्तक आहे.

प्रकाश जाधव

साहेबांच्या देशात हे पुस्तक विशेषतः त्या वाचकांसाठी महत्त्वाचं आहे, ज्यांना इतिहास, समाज आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध समजून घ्यायचा आहे. हे…

Scroll to Top