WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

मा. दिलीप माजगावकर सरांना लोकमत जीवनगौरव पुरस्कार प्रदान !

‘राजहंस प्रकाशना’ ची वाटचाल सुरू झाल्याला आज सात दशकांकाहून अधिक काळ लोटला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९५२ मध्ये ‘राजहंस’ ची स्थापना केली. पुढे १९५७ साली श्री. ग. माजगावकर यांनी बाबासाहेबांसोबत कामाला सुरूवात केली. पुढे या दोघांच्या प्रयत्नातून ही प्रकाशनसंस्था वाढत गेली. प्रकाशनाच्या प्रारंभीच्या काळातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र ‘राजहंस प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध झाले.‘राजहंस प्रकाशना’चे संवर्धक श्री.ग.माजगावकर यांची सजग सामाजिक जाणीव, वैचारिक मोकळेपणा, निरनिराळ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींबद्दलची आस्था या साऱ्यांचा ठसा ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांच्या विषयनिवडीपासून जाणवत होता. प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रांचे समृद्ध दालन, राजकीय व ऐतिहासिक विषयांवरील व समाजकारणावरील प्रभावी पुस्तके ही साहजिकच ‘राजहंस’ ची ठळक वैशिष्ठ्ये ठरली.

१९६६ साली श्री.ग. माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर ‘राजहंस’मध्ये दाखल झाले आणि आता ते संस्थेचे संचालक म्हणून काम पाहतात. पुस्तकनिर्मितीबरोबरच पुस्तकवितरण आणि विक्री या घटकांचा विचार करून त्यावर योग्य तो भर द्यायला हवा, असे दिलीपरावांचे मत होते. त्य़ांनी या दृष्टीने विचार करायला सुरूवात केली. ‘राजहंस प्रकाशना’चे सामाजिक बांधिलकीचे धोरण, वाचकाला सकस वैचारिक आशयसंपन्न साहित्य देण्याची धडपड या गोष्टी एका बाजूला जपत असतानाच भिन्न थरांतले सुजाण, चोखंदळ, रसिक वाचक आणि ‘राजहंस प्रकाशना’चे नवे-जुने लेखक यांच्याबरोबरच्या संवादातून वाचकाची आवडनिवड जागरूकतेने जाणण्याचाही दिलीप माजगावकरांचा प्रयत्न होता. वर्तमानाच्या समस्या, क्षितिजावर डोकावत असलेली विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीची किरणे, नव्या पिढीच्या नव्या गरजा, त्यांच्यापुढे उभ्या ठाकणाऱ्या नव्या प्रश्नांची नवी उत्तरे – नव्या शक्यता या सा-यांचा मागोवा घेणारी पुस्तके ‘राजहंस’च्या यादीत समाविष्ट होऊ लागली. ‘राजहंस’च्या आधीच्या दालनांना विज्ञान, पर्यावरण, अंधश्रध्दानिर्मूलन अशा अन्य विभागांची जोड मिळाली. ललित वाड्.मयातील नव्या नावांना अन् नव्या प्रवाहांना ‘राजहंस’ने प्रथितयश साहित्यिकांच्या हातात हात मिळवून पुढे आणले.

या साऱ्या वाटचालीत दिगमांच्या पत्नी रेखा माजगावकर यांची त्यांना भक्कम साथ लाभली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमीच स्वागतशील राहिले आहे. ‘राजहंस प्रकाशना’ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्या त्या क्षेत्रांतील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या पुस्तकलेखनाने अत्यंत आगळीवेगळी कामगिरी उभी केली. ‘राजहंसी’ ग्रंथसूचीमध्ये सर्व वाड्:मयप्रकार आहेत, पण त्यातही चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि विज्ञान ही ‘राजहंस प्रकाशना’ची नाममुद्रा उमटलेली खास दालने आहेत.

‘राजहंस प्रकाशना’तर्फे आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संपादक मंडळ ही ‘राजहंस’ची कायमच भक्कम बाजू राहिली आहे. या संपादकांमध्ये विविध विषयांवर प्रभुत्व असणाऱ्या जाणत्या संपादकांचा समावेश ही ‘राजहंस’ची खासियत आहे. आनंद हर्डीकरविनया खडपेकरशिरीष सहस्रबुद्धेकरुणा गोखलेडॉ. सदानंद बोरसे, हे ‘राजहंस’च्या पुस्तकांच्या संपादनाचे काम अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. याबरोबरच शिरीष शेवाळकर ‘राजहंस’च्या पुस्तकांचे निर्मितिप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतात.

२०२० पासून ‘राजहंस’ने डिजिटल विश्वातही आपला ठसा उमटवला आहे. संकेतस्थळावरून पुस्तकांची विक्री करणे, समाजमाध्यमाव्दारे पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे तसेच ‘राजहंस’च्या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती अशा एक ना अनेक गोष्टी ‘राजहंस’ने २०२० पासून सुरू केल्या आहेत. या सर्वांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणे हाच मुख्य उद्देश असल्याने दि.ग.मा. यांनी या सर्व उपक्रमांना सुरूवातीपासूनच प्रोत्साहन दिले आहे. वयाच्या ८० व्या वर्षातही तरुणाला लाजवेल, अशा उत्साहाने नव्या प्रवाहांशी, नव्या तंत्रज्ञानाशी नाते जोडण्याचे दि.ग.मा. यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. या सर्व कामगिरीमुळे आतापर्यंत ‘राजहंस प्रकाशना’ला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्यातील व राज्याबाहेरीलही मराठी वाचक जोडायचा असेल तर पुण्याबरोबरच इतर शहरांमध्येही शाखा सुरू करणे आवश्यक आहे. हाच विचार करून ‘राजहंस’ने मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि गोवा याठिकाणी शाखाविस्तार केला आहे.

Latest Posts

कसा  सापडला  कार्व्हर?

पुस्तकामागच्या गोष्टी  #एकहोताकार्व्हर   प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची काही ना काही गोष्ट...

विवेकयात्री

डॉ. शरद जावडेकर ‘सदविवेकवीण सर्व भांबावले,  रक्तपाती झाले ज्योती म्हणे!’...

काळ्यानिळ्या रेषा

दाहक सामाजिक दस्तावेज.. डॉ. प्रिया  निघोजकर  मराठी साहित्यातल्या आत्मकथनांच्या परंपरेत साठच्या...

Scroll to Top