Phoenix | फिनिक्स
फिनिक्स ही कादंबरी नाही. आणि ती कुणाची प्रेरक यशोगाथाही नाही.
जीवनातल्या एका आघातातून विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्याच्या
प्रवासाचे हे एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि दर्शन आहे. हा प्रवास सांगणाऱ्याला
आणि लिहिणाऱ्याला कुणाचाही राग नाही, लोभही नाही. जे घडलं ते
जसंच्या तसं सांगण्याची प्रबळ इच्छा आहे. मानसिक धक्क्यातून सावरायला
लागलेला वेळ, मग निराशा, परावलंबित्व आणि त्यातून बाहेर पडण्याच्या
जिद्दीतून जन्माला आलेली ध्येयासक्ती या मनाच्या प्रवासाचं या पुस्तकामध्ये तपशीलवार वर्णन
आहे. कुठलंही भावनिक प्रदर्शन न करणारं असं लेखन वाचायला मिळणं ही आजच्या वाचकाची
गरज आहे. आणि ती गरज भागवल्याबद्दल मेघा आणि धनंजय यांचे मनापासून आभार. ज्या
तटस्थपणे ते लिहिलं गेलं आहे, त्याच तटस्थपणे वाचकांनी ते वाचावं, अशी माझी इच्छा आहे.
डॉ. मोहन आगाशे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ -----------------------------------------
आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग अगर क्षण आपल्यापासून काय
काय हिरावून घेऊ शकतो आणि ते हिरावून घेतल्यानंतर जेव्हा
आपल्यापाशी जगण्याची उमेद राहत नाही; तेव्हा अचानक एक उमेदीचा
जिवंत झरा आपल्यात आहे, ह्याची जाणीव कळत नकळत होत असताना
पुन्हा एकदा आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहण्याची ही गोष्ट. एक
प्रकारे आपल्याला आपल्या आत डोकवायला लावणारी आणि आपल्यातल्या अपार शक्तीचे
दर्शन घडवणारी. अत्यंत परिणामकारक आणि तरी साध्या भाषेत तुमच्याशी संवाद साधणारी
आणि तुमच्यातल्या एकाकी माणसाला साथ देणारी अशी ही एका फिनिक्स माणसाची अनवट
यात्रा! ह्यातल्या धनंजयना आणि त्यांना जवळून साथ देणाऱ्या मेघाला सलाम!
सागर देशमुख प्रख्यात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक -----------------------------------------
काट्याचा नायटा व्हावा, तशी एका साध्या अपघातातून अनंत यातनांची
मालिका सुरू झालेली धनंजयची ही कथा. त्याच्या सहनशीलतेची परीक्षा
घेणाऱ्या वेदनांचा प्रवास वाचताना नकळत डोळ्यातून अश्रू ओघळतात.
त्याची जिद्द, डॉक्टरांची आपुलकी, फिजिओथेरपीचे विलक्षण अनुभव आणि
कुटुंबीयांची खंबीर साथ बघून मन अचंबित होते. धनंजयची वाटचाल ही
सामान्यातून असामान्याकडे घेतलेली झेप आहे. आणि त्याची आंतरिक खळबळ डॉ. मेघा
देऊसकर यांनी अशी शब्दबद्ध केली आहे की, पुस्तक एकदा वाचायला घेतले की, खाली
ठेवावे असे वाटत नाही.
स्वामिनी विक्रम सावरकर समाजसेविका, लेखिका
- पहिली आवृत्ती : जुलै २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- मुखपृष्ठ : स्वप्नील कारळे
- राजहंस क्रमांक : G-06-2022