
Anahat Christ | अनाहत ख्रिस्त
‘अनाहत ख्रिस्त’ असे हृदयस्पर्शी शीर्षक प्रभू येशू ख्रिस्तावरील
अतिशय वाचनीय अशा संग्रहणीय पुस्तकास देऊन सिध्दहस्त
विद्वान लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी श्रध्दावंत वाचकांच्या
मनाला साद घातली आहे. हे संपूर्ण विवेचन ख्रिश्चनांचा प्रमाणभूत
धर्मग्रंथ ‘बायबल’ यावर आधारित आहे.
लेखक स्वत: कल्पक आणि भावूक असूनही प्रस्तुत लिखाण
हे निश्चितच वस्तुनिष्ठ, निष्पक्ष विश्वासार्ह झाले आहे ते बायबलमधील
वर्णनाशी सुसंगत असल्यामुळेच. लेखकाची भाषा प्रासादिक, मृदू आणि
मवाळ असूनही पुस्तक वैचारिक, विचारपरिप्लुत आहे, हे निस्संशय.
प्रभू येशू ख्रिस्त खरा मनुष्य आणि खरा देव आहे. तो परिपूर्ण जीवनाचे
दान देणारा मुक्तिदाता आहे. त्यामुळे कोणतेही पुस्तक ख्रिस्ताला
संपूर्णतया आपल्या कवेत सामावू शकत नाही,
शिवाय फादर दिब्रिटोंनी वेदनेच्या अंगाने ख्रिस्तचरित्राचा
वेध घेतला हे योग्यच आहे. तरीही ख्रिस्ताचे अनेकविध पैलूंनी
मंडित असे व्यक्तिमत्त्व केवळ वेदनेच्या दृष्टीने संपूर्णपणे
समजून घेता येणार नाही. शिवाय केवळ वेदनेच्याच आधारे
ख्रिस्तचरित्र व्यक्त करण्यात नैराश्यवादाचा धोका असू शकतो.
मानवी जीवनाची सार्थकता आनंदात असणे आवश्यक आहे.
येशूची मुक्ती आनंदाचा मूलस्रोत आहे. ‘मी तुम्हाला परिपूर्ण
आनंद देईन आणि तुमचा आनंद कुणीही हिरावून
घेऊ शकणार नाही!’ असे ख्रिस्ताचे आशावर्धक आवाहन आहे.
अर्थात थोर साहित्यिक दिब्रिटोंचीही हीच भूमिका आहे, हे निश्चित.
एक सुंदरसे वैशिष्ट्यपूर्ण आणि लालित्यपूर्ण पुस्तक
लिहिल्याबद्दल फादर दिब्रिटो ह्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
बिशप डॉ. थॉमस डाबरे.
- पहिली आवृत्ती - ३ डिसेंबर २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी - चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : L-01-2022
More Books By Father Fransis D’britto | फादर फ्रान्सिस दिब्रिटो

