पत्रकार, समीक्षक, शास्त्रीय संगीताचे जाणकार, मर्ढेकर-शेक्स्पिअर यांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, गिर्यारोहक आणि वक्ते अशा विविध कॅलिडोस्कोपिक रूपांत लीलया वावरणारे विनय हर्डीकर हे काहीसे कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. काही माणसे विनाकारण स्वतःविषयी गैरसमज निर्माण करून ठेवतात; तर काही माणसांबद्दल इतर लोक गैरसमज निर्माण करून घेतात. हर्डीकर या दोन्ही प्रवादांचे धनी आहेत आणि याची त्यांना स्वतःलाही चांगली जाणीव आहे, पण तरीही ‘आपण बुवा असे आहोत आणि असेच राहू’ हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे हर्डीकर अनेकांना हेकेखोर वाटतात.
* मात्र, तरीही मूळचा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड, पत्रकाराची शोधक दृष्टी, चौफेर भ्रमंती आणि जोडीला अनेकविध विषयांचा व्यासंग-अभ्यास आणि प्रत्येक विषयावरची स्वतःची खास ठाम आणि परखड मते, यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांना भुरळ पडते.
* काव्य, चित्रपट, संगीत, खेळ, शेती, सामाजिक चळवळी, राष्ट्रीय राजकारण, कुठलाही विषय काढा त्यात हर्डीकरांचा व्यासंग असतोच असतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आणि त्यांच्या व्यासंगाचा आवाका आता आकळू लागला आहे, असे वाटू लागते न लागते तोच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू समोर येतो, त्यांच्या व्यासंगाचा नवा विषय समजतो आणि विस्मयचकित व्हायला होते!
* हर्डीकरांशी मैत्री असणे हा बौद्धिकदृष्ट्या फार आनंदाचा भाग असला तरी ही गोष्ट सहज परवडणारी नसते. त्यांच्या वागण्या-बोलण्याला एक तीक्ष्ण आणि तिखट धार असते. ‘अघळपघळपणा’ वा ‘शिळोप्याच्या गप्पा’ या गोष्टी त्यांचा शब्दकोशात नाहीत. शिवाय त्यांचे प्रसंगावधान इतके जबरदस्त आहे की, तुम्ही चुकून एखादा उणा-वावगा शब्द बोललात, तरी ते तुमचा खिमा करून टाकतात! चुकलेल्या कुणाचीही ते गय करत नाहीत, अगदी स्वत:चीही. त्यामुळे त्यांचा तिखटपणा साहवतो. कारण त्यात हिशेबीपणा नसतो; आपपरभाव नसतो. ‘सत्याला सत्य म्हणून जाणा आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’ या गौतम बुद्धाच्या वचनाचा प्रत्यय ते आपल्या वाणी व लेखणीतून सतत करून देतात. म्हणून स्वत:च्या ‘टर्म्स अँड कंडिशन्स’वर जगणारा हा माणूस काहीसा फाटक्या तोंडाचा असला, तरी तितकाच लोभसही आहे!
त्यांचा मित्र-स्नेही परिवार अफाट आणि तोही विविध क्षेत्रांमधला आहे. कारण समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेण्याची, खिशात टाकण्याची त्यांची एक तऱ्हेवाईक, पण आत्मीय ट्रिक आहे. तिचा ते खुबीने वापर करतात. एकदा जोडलेला माणूस सहसा तोडला जाऊ नये, याची तापट स्वभाव असूनही ते तितकीच काळजीही घेतात! काही माणसांना फार चांगल्या प्रकारे विचार करता येतो, तो इतरांना तितक्याच चांगल्या प्रकारे सांगताही येतो; पण तो विचार आणि प्रत्यक्षातला व्यवहार यातील विसंगती मात्र त्यांना फारशी कमी करता येत नाही. अनेकदा ते त्यांच्या लक्षातही येत नाही. हर्डीकरांच्या विचार आणि व्यवहारात मात्र कमालीचे साधर्म्य आहे!
माणूस म्हणून विनय हर्डीकर काहीसे तऱ्हेवाईक असले, तरी लेखक म्हणून मात्र अतिशय समतोल, तारतम्यपूर्ण आणि समंजस आहेत. त्यांचे बोलणे आणि लिहिणे यात कमालीचे साम्य आहे. त्यामुळे एकदा कागदावर उतरलेला मजकूर हाच त्यांचा अंतिम खर्डा असतो. त्यात काही बदल करण्याची गरज त्यांना पडत नाही. लेखनाबाबतची त्यांची ही शिस्तबद्धता आणि काटेकोरपणा या दोन्ही गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. त्यामुळे गेल्या सदतीस वर्षांमध्ये त्यांच्या नावावर अवघी पाच पुस्तके आहेत. वयाच्या २९व्या वर्षी लिहिलेले ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे त्यांचे पहिलेच पुस्तक बरेच गाजले होते.
आणीबाणीच्या विरोधात लिहिलेल्या या पुस्तकाला १९८१मध्ये महाराष्ट्र सरकारने आधी पुरस्कार जाहीर करून नंतर तो नाकारला होता. साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे ‘श्रद्धांजली’ (१९९७), बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांची चरित्रात्मक अंगाने समीक्षा करणारे ‘कारुण्योपनिषद’ (१९९९), राजकीय-सामाजिक लेखांचे ‘विठोबाची आंगी’ (२००५) आणि गतवर्षी प्रकाशित झालेले व ‘श्रद्धांजली’चा पुढचा भाग म्हणता येईल अशा मान्यवरांवरील लेखांचे ‘देवाचे लाडके’ (२०१५), ही त्यांची इतर पुस्तकेही तितकीच तोलामोलाची आणि महत्त्वाची आहेत. .
‘माझं लेखन हे फर्स्ट पर्सन डॉक्युमेंटरी आहे’ असे हर्डीकर स्वतःच्या लेखनाविषयी म्हणतात. कारण स्वतःचे अनुभवसिद्ध विश्व आणि वाचन हा त्यांच्या लेखनाचा गाभा असतो. हर्डीकरांचे अनुभवविश्वही खूपच विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्य (मराठी-हिंदी-इंग्रजी), राजकारण, समाजकारण, सामाजिक चळवळी-आंदोलने, शास्त्रीय संगीत अशा क्षेत्रांत त्यांना कमालीचा रस आहे आणि या क्षेत्रांची त्यांना उत्तम जाणही आहे.
ज्ञानप्रबोधिनी, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्स्प्रेस, ग्रामायण, शेतकरी संघटना, देशमुख आणि कंपनी, रानडे इन्स्टिट्यूट (पुणे विद्यापीठ) आणि फ्लेम हे पुण्यातील खासगी विद्यापीठ असा विनय हर्डीकरांचा वैविध्यपूर्ण प्रवास आहे. या प्रत्येक ठिकाणी ते स्वतःहून गेले आणि मनासारखे काम करता येत नाही हे लक्षात आल्यावर देशमुख आणि कंपनी वगळता त्या-त्या ठिकाणांहून स्वतःहून बाहेर पडले.