रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते.त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली.
* फडके यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तीगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत.
* कवी ग.दि. माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली.
*** जीवन
बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.
* त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.
* आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४)
* कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्टूगिस वसाहती मुक्त करण्यासाठी ,'आझाद गोमन्तक'दलाचे सदस्य होते .२ ऑगस्ट १९५४ रोजी दलाच्या तरुणांना नी सशस्त्र हल्ला करून दादरा वानगर हवेली पोर्तुगिस सत्तेपासून हा प्रदेश मुक्त केला.गोवा मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती.
* बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत
*** गायक
एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :
*** पुरस्कार
१. राष्ट्रपती पदक (१९६३) - हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
२. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२)
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)