सुबोध प्रभाकर जावडेकर (इ.स. १९४८:इस्लामपूर, महाराष्ट्र -हे मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक आहेत
* जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर येथे आणि त्यानंतरचे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीला झाले. ते चिकुर्डे गावातून मॅट्रिक झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर झाल्यावर त्यांनी मुंबई आयआयटी मधून १९७१ साली रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळवली.
* त्यांनतर एसीसी, हिंदुस्तान लिव्हर, स्टँडर्ड अल्कली व जेकब्स या कंपन्यांमध्ये सदतीस वर्षे नोकरी करून २००८ साली जनरल मॅनेजर या पदावरून ते निवृत्त झाले.
* जावडेकरांनी पहिली विज्ञानकथा १९८२ साली लिहिली. या रचनेस मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप) दरवर्षी भरत असलेल्या विज्ञान रंजन कथा स्पर्धेमध्ये दुसरे बक्षिस मिळाले. त्यानंतर त्यांनी सुमारे शंभरएक विज्ञानकथा लिहिल्या आहेत.
* जावडेकरांच्या विज्ञानकथा विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या असतात आणि तरीही रूढ विज्ञानकथांपेक्षा वेगळ्या असतात. त्या माणसांच्या कथा असतात.
* अरुण साधूंच्या शब्दांत ‘त्यांत विज्ञान, तंत्रज्ञानाने प्रगत झालेल्या परिसरातील व्यक्तींमधील नातेसंबंधाला नव्याने दिलेल्या परिमाणांचे चित्रण असते.’
* तर प्रसिद्ध लेखिका कमल देसाई यांच्या मते, ‘या नुसत्या विज्ञानकथा नाहीत तर मानव आणि विज्ञान हे दोन्ही मिळून जे रसायन घडतं त्याच्या कथा आहेत.
* आपल्या कथांमधून भोवतालच्या वास्तवाचे नेमके पण भेदक दर्शन घडवत असतानाच जावडेकर भविष्याचा, येणाऱ्या घटनांचा अचूक वेध घेतात. नवकथा आणि विज्ञानकथा यांच्या संकरातून साकार झालेली सुबोध जावडेकरांची वेगळा मार्ग शोधणारी कथा आहे, असं निरीक्षण दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नोंदवले आहे.
त्यांच्या काही कथांमध्ये संगणकांचे आक्रमण मानवी जीवनावर कसे होत आहे त्याचे कल्पकतापूर्ण चित्र येते. त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक समस्याही ते हाताळतात.
* 'आकांत Archived 2020-10-09 at the Wayback Machine.' ही त्यांची कादंबरी भोपाळ येथे झालेल्या वायू दुर्घटनेवर आधारित आहे. पण तिला राजकीय रंग न देता ती त्यांनी सामान्यांच्या जीवनसंघर्षाला घेऊन भिडवली आहे.
* सर्वसामान्य वाचकाला सोप्या व रंजक भाषेत विज्ञान समजावून सांगणारी काही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांचा विज्ञान विषयक व्यासंग आणि सामान्यांना त्याचा खुसखुशीत पद्धतीने परिचय करून देण्याची हातोटी यांचे दर्शन या पुस्तकांतून घडते.अचूक वैज्ञानिक माहिती आणि प्रभावी कल्पनाशक्ती ह्यांचा उत्तम मेळ त्यांच्या लेखनात घातलेला असतो.
* ‘हसरं विज्ञान’ हा त्यांचा विज्ञानावर विनोदी अंगाने लिहिलेला लेखसंग्रह आहे. प्लॅस्टिक या विषयावर त्यांनी चार माहितीपूर्ण पुस्तके लिहिली आहेत.
* त्यांचे लेखन नेटके व संयत असते. विज्ञानविषयक लेखन असूनही शैली ललित अंगाने जाते, त्यामुळे वाचताना औत्सुक्य वाटत राहते. जीवनातील भावपूर्ण नाट्यात्मतेचे त्यांना भान आहे. शिवाय त्याला नर्म विनोदाचा एक हलकासा अंतःस्तर असतो.
‘* मेंदूतला माणूस’ (डॉ. आनंद जोशींसह) व ‘मेंदूच्या मनात’[१२] ही त्यांची दोन पुस्तकं गेल्या दहावीस वर्षांत मेंदूवर झालेल्या संशोधनामुळे माणसाच्या वागण्यावर कसा प्रकाश पडतो आहे ते रंजक पद्धतीने दाखवून देतात. ‘आपले बुद्धिमान सोयरे’ हे पुस्तक प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर अलीकडे झालेल्या संशोधनाबद्दल माहिती देते.
* मेंदूविज्ञान आणि मानवी वर्तन या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत.
सुबोध जावडेकरांची २०१८ सालापर्यंत १९ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
*** पुस्तके
जावडेकर यांची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
* अचंब्याच्या गोष्टी (सहलेखक मधुकर धर्मापुरीकर)
* आकांत (भोपाळ दुर्घटनेवर आधारित कादंबरी)
* आकाशभाकिते (विज्ञानकथा संग्रह)
* आपले बुद्धिमान सोयरे
* कुरुक्षेत्र (कथासंग्रह)
* गुगली (विज्ञानकथा संग्रह)
* चाहूल उद्याची (कथासंग्रह)
* चिंतामणी हा नव्या युगाचा
* पुढल्या हाका (विज्ञानकथा संग्रह)
* मेंदूच्या मनात
* प्लॅस्टिकची मेजवानी
* मेंदूतला माणूस (सहलेखक डॉ. आनंद जोशी)
* यंत्रमानव (सहलेखक अ.पां. देशपांडे)
* वामनाचे चौथे पाऊल (विज्ञानकथा संग्रह)
* विज्ञानाच्या नव्या वाटा
* विज्ञानाची नवी क्षितिजे
* संगणकाची सावली (विज्ञानकथा संग्रह)
* हसरं विज्ञान (विज्ञानावर ललित अंगाने)
* प्लॅस्टिक फीस्ट (इंग्रजी व दहा भारतीय भाषांतून)
*** पुरस्कार
* गुगली ह्या पहिल्याच कथा संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
* ‘हसरं विज्ञान’ ह्या पुस्तकास राज्यपारितोषिक व 'र. धो. कर्वे पुरस्कार'
* सार्वजनिक वाचनालय, नाशिक तर्फे 'डॉ. आ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार'
* मेंदूतला माणूस या पुस्तकास सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेचा पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे 'प्रा. गो. रा. परांजपे पुरस्कार'[
* ‘आकाशभाकिते’ ह्या विज्ञानकथासंग्रहास राज्यपारितोषिक
‘* कुरुक्षेत्र’ ह्या कथासंग्रहास 'केशवराव कोठावळे पुरस्कार
* ‘पुढल्या हाका’ कथासंग्रहास यशवंतराव दाते, वर्धा संस्थेचा 'शिक्षणमहर्षी देशमुख पुरस्कार'
* महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेचा 'सु. ल. गद्रे साहित्त्यिक पुरस्कार'
‘* चाहूल उद्याची’ या कथासंग्रहास मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचा राज्यस्तरीय ‘श्रीस्थानक साहित्य पुरस्कार
* महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा साहित्य पुरस्कार –‘विज्ञानकथा’ या वाङ्मय प्रकारासाठी