पं. सत्यशील देशपांडे - गायक, संगीतज्ज्ञ, रचनाकार, लेखक
* जन्म : ९ जानेवारी १९५१
* हिंदुस्तानी संगीत परंपरेचे गाढे अभ्यासक, सृजनशील गायक, रचनाकार व लेखक अशा अनेक भूमिका समर्थपणे राबवणारे पं. सत्यशील देशपांडे एक बहुआयामी, बहुपेडी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. प्रसिध्द संगीतज्ञ कै. वामनराव देशपांडे यांचे ते सुपुत्र.
* वडिलांचा 'घरंदाज गायकी' हा विविध घराण्यांच्या सौंदर्य शास्त्रीय मूल्यांचा शोध घेणारा ग्रंथ सिद्ध होत असताना, त्यात मांडलेल्या सिद्धांतांचे व त्यावर वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकांच्या गावून व्यक्त झालेल्या क्रिया-प्रतिक्रियांचे संस्कार लहानपणीच सत्यशीलजी यांना मिळत गेले व खोलवर रुजले.
* पुढे १९७२ साली कै. पं. कुमार गंधर्व यांच्या घरी देवास येथे राहून सत्याशीलजीनी सलग तीन वर्षे सर्वंकष तालीम घेतली. लहानपणी मिळालेला 'घरंदाज गायकी'चा संस्कार आणखी दृढमूल करणारी, परंपरेच्या आधारावर स्वत:चे असे सौंदर्यशास्त्रीय दृष्टीकोन घडवण्यास प्रोत्साहित करणारी अशी ही तालीम होती. 'कलेचे गूढरम्य प्रदेश हे शास्त्र-व्याकरणाच्या सीमेला चिकटून तिथेच असतात व या सीमेवर एकामागून एक येणा-या आवर्तनांची शृंखला गायक आपले संस्कार, आपली तात्काळ उत्स्फूर्तता व आपली कलाकारी वापरून आंदोलित करत राहतो' हा गुरुमंत्र घेऊन सत्यशीलजी मुंबईला परतले.
* याच संगीतकलेच्या प्रदेशात मुशाफिरी करण्यासाठी, शास्त्रीय संगीताच्या अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध गायकांचे व अभ्यासकांचे गाणे त्यांच्या सांगीतिक विचारांसह ध्वनिमुद्रित करून जतन करण्याचा उपक्रम फोर्ड फाउंडेशनच्या साहाय्याने सत्यशीलजीनी सुरू केला.
* मुंबई येथे त्यांनी स्थापित केलेल्या 'संवाद फाउंडेशन' या संस्थेत आजतागायत हे त्यांचे कार्य अविरत चालू आहे. आजमितीला सुमारे पाच हजार तासांपेक्षा जास्त संकलित ध्वनिमुद्रण व अनेक बुजुर्ग गायकांकडून गोळा केलेल्या बंदिशींच्या अप्रकाशित अशा नोटेशन्सचा मोठा संग्रह असे या आर्काईव्हजचे स्वरूप आहे. अनेक तरुण गायक अभ्यासकांना आज संवाद फाउंडेशनमुळे आपली परंपरा पडताळून पाहण्याची संधी मिळत आहेच, शिवाय या व्यासंगामुळे सत्यशीलजींचे स्वत:चे बहुआयामी सांगितिक व्यक्तिमत्वही घडत गेले आहे. एकाच रागाच्या अनेक छटा वेगवेगळ्या बंदिशींच्या माध्यमातून ते स्वत:ही अनेक मैफिलींतून तसेच कार्यशाळांतून गाऊन श्रोत्यांपर्यंत पोहचवत असतात.
* परंपरेत दडलेली व स्वत:च्या प्रतिभेतून निघणारी सौंदर्याची विविध रूपे दाखवणारी प्रगल्भ गायकी ते स्वत: उत्तम गातातच; परंतु स्वर-राग-लय-ताल काल-भाव आणि साहित्याच्या माध्यमातून काहीतरी सांगायचं जे उरतं, त्यासाठी उत्तम स्वर - रचनेबरोबरच बंदिशीला पोषक काव्यरचनाही ते उत्तमरीत्या करतात.
* कुठलाही सांगीतिक विषय असो अथवा एखादी नवीन बंदिश असो; त्यांचे हिंदी, उर्दू व मराठी या भाषांवरील प्रभुत्व जाणवल्याशिवाय राहत नाही. संगीतावर वेळोवेळी मार्मिक लेखन व सप्रात्याक्षिक भाष्य करणारे संगीतज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात. एक चिंतनशील गायक ते चिंतनशील नायक असा गूढरम्य प्रवास म्हणजे पं. सत्यशील देशपांडे.
* देश-विदेशात अनेक मैफिली गाजवणारे पं. सत्यशील देशपांडे यांची आणखी एक ओळख म्हणजे 'लेकीन' (जूठे नैना बोले) आणि 'विजेता' (मन आनंद आनंद छायो) या चित्रपटांमधील श्रीमती आशा भोसले यांच्यासमवेत गायलेल्या युगुलगीतांसाठी त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे.
* 'हे गीत जीवनाचे' या मराठी चित्रपटात त्यांनी 'सूर येती विरून जाती' हे लोकप्रिय गीत श्रीमती लता मंगेशकर यांच्याबरोबर गायले आहे. तसेच 'कहन' हा पारंपारिक तसेच स्वरचित बंदिशींचा त्यांचा ध्वनीमुद्रित संग्रह भारतरत्न लतादीदींच्या हस्ते लोकार्पण झाला व त्यात मांडलेल्या विविधांगी सौंदर्यमूल्यांसाठी अतिशय लोकप्रिय ठरला.
*** पुरस्कार
* १९९६ साली 'होमी भाभा फेलोशिप'
* १९९९ साली 'कुमार गंधर्व फेलोशिप
* 'सूरसिंगार संसद' चा 'तानसेन पुरस्कार'
* 'रझा फाउंडेशन पुरस्कार'
* 'विमला देवी पुरस्कार' - जो 'संवाद फाउंडेशन' ला सांगीतिक समाजसेवेसाठी दिला गेला,
* २०१३ साली 'वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार
* २०१८ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव पुरस्कार'
* अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले पं. सत्यशील देशपांडे नेहमी एखाद्या बंदिशीची वीण सोडवण्यातच दंग झालेले आपणास नजरेस येतात.