पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.
*** मंगेश पाडगांवकरांचे अनुवादित साहित्यातील योगदान
साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.[ संदर्भ हवा ]
*** त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.
*** पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.