मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे शिक्षण कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथे झाले. ते संरक्षण विषयातील एम.एस्सी आणि मास्टर ऑफ इंजिनीयिंरग (स्ट्रक्चर्स) आहेत. डिसेंबर १९६२मध्ये डेहराडूनच्या सैनिकी अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सैन्याच्या अभियंतादलात त्यांची अधिकारपदावर नेमणूक झाली.
* सेकंड लेफ्टनंट ते मेजर जनरल या त्यांच्या ३६ वर्षांच्या सैन्यसेवेदरम्यान त्यांना भारताच्या सर्व सीमांवर काम करण्याची संधी लाभली. १९६५ आणि १९७१च्या युद्धांत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. १९८७-८९च्या श्रीलंकेमधील भारतीय शांतिदलाच्या मुख्यालयात ते वरिष्ठ परिचालन अधिकारी (कर्नल ऑपरेशन्स) होते.
* कोअर ऑफ इंजिनियर्सचे अधिकारी असूनही १९९०मध्ये पायदळाच्या तुकड्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड झाली. सिक्कीम सीमेवर आणि मणिपूरच्या अशांतिपूर्ण भागात त्यांनी इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले. त्यानंतर भारताच्या पश्चिम सीमेवर त्यांनी इन्फंट्री डिव्हिजनची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली.
* १९९८मध्ये सैन्यामधून निवृत्त होण्यापूर्वी ते सिमल्यामधील आर्मी ट्रेिंनग कमांडचे उपप्रमुख होते.
* निवृत्तीनंतर जनरल पित्रे यांनी विविध संरक्षण विषयांवर चौफेर लेखन केले. कारगिल युद्धादरम्यान सकाळमधील त्यांचे `व्यूह आणि वेध' हे सदर कमालीचे गाजले. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि इराक युद्धे चालू असताना त्यांनी ‘लोकसत्ता'मध्ये लिहिलेली प्रदीर्घ सदरे वाचकांना आवडली. ‘लोकमत'मधील `संस्मरणीय रणसंग्राम' हे सदरसुद्धा लोकप्रिय ठरले. विविध मराठी आणि इंग्रजी चित्रवाहिन्यांवरील चर्चेत संरक्षणविषयक विश्लेषणासाठी त्यांना बोलावण्यात येते.
* काश्मीर प्रश्नावरील त्यांच्या `डोमेल ते कारगिल' या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या २००१च्या सर्वोत्तम ग्रंथ या पारितोषिकाने गौरवण्यात आले.
* त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेल्या अॅडमिरल सोमण व जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या चरित्रांना आणि ‘श्रीलंकेची संघर्षगाथा' या पुस्तकांनाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
* १९६२च्या भारत-चीन युद्धावरील त्यांनी लिहिलेल्या `न सांगण्याजोगी गोष्ट - ६२च्या पराभवाची शोकांतिका' या पुस्तकाला अद्यापपर्यंत केसरी मराठा संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पार्ले टिळक मंदिर आणि उत्कर्ष मंडळ पार्ले यांच्याकडून दिल्या जाणार्या प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
* विशेष लक्षवेधी सन्मान म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वाङ्मय पुरस्कारांपैकी प्रौढ वाङ्मय विभागात इतिहासासाठी असलेला राजर्षी शाहू पुरस्कार मेजर जनरल पित्रे यांना सलग दोनदा लाभला.
* सन २०२०साठीचा पुरस्कार `या सम हा' या पुस्तकासाठी तर सन २०२१साठीचा पुरस्कार `जयतु शिवाजी, जयतु शिवाजी' या पुस्तकासाठी त्यांना प्रदान करण्यात आला.
* जनरल पित्रे यांची महाराष्ट्र शासनाने मराठी विश्वकोश समितीच्या सदस्यपदी नेमणूक केली आहे. सुधारित विश्वकोशाच्या `सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा' या खंडाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर सैन्यात अधिकारी हुद्द्यावर प्रवेश करू इच्छिणार्या तरुणांना एन. डी. ए.च्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद येथे महाराष्ट्र शासनातर्फे स्थापन केलेल्या `सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट' या संस्थेचे ते विश्वस्त आहेत.
* जनरल पित्रे यांनी इतर निवृत्त सैनिकी अधिकार्यांच्या साहाय्याने भूतपूर्व सैनिकांची `होरायझन' ही धर्मादाय संस्था २००१मध्ये स्थापन केली. ही `सैनिकांची आणि सैनिकांसाठी' संघटना परदेशात संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने भूसुरुंग निकामी करण्याच्या कामाला वाहिलेली आहे. अद्यापपर्यंत श्रीलंका, जॉर्डन, कुवैत वगैरे देशांत त्यांनी सुमारे दीड लाख भूसुरुंग निकामी करून उल्लेखनीय मानवीय काम केले आहे. त्याबद्दल या संस्थेलाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
* ३९ लढायांत अजेय राहिलेल्या पहिले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय युद्धनीती आणि लष्करी नेतृत्वावर जनरल पित्रे यांनी लिहिलेल्या `या सम हा' या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या शुभहस्ते १ फेब्रुवारी २०२०ला झाले.
* युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन (यूएसआय) या नवी दिल्लीतील प्रख्यात `थिंक टँक'मधील `भगत मेमोरियल चेअर ऑफ एक्सलन्स' या प्रतिष्ठेच्या पदावर सन २०२३-२४साठी जनरल पित्रे यांची नियुक्ती झाली, ही विशेष सन्मानाची गोष्ट.