आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जन्म : १९ जुलै १९३८) यांना वारसा लाभला तो अध्ययनशील आणि महाप्रज्ञ मातापित्यांचा. जयंतरावांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभागप्रमुख होते, तर मातु:श्री सुमतीबाई (पूर्वाश्रमीच्या कृष्णा शंकर हुजूरबाजार) संस्कृतच्या पंडिता. त्यामुळे जयंतरावांना लहानपणापासून गणित आणि संस्कृत या विषयांसंबंधी विशेष अभिरुची वाटू लागली.
* बनारस हिंदू विद्यापीठातून १९५७ मध्ये बी.एससी.ची पदवी संपादन केल्यावर डॉ. जयंत नारळीकर गणिताचे विशेष अध्ययन करण्यासाठी इंग्लंडमधल्या ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठात प्रविष्ट झाले. तेथे ते १९६० मध्ये बी.ए., १९६३ मध्ये पीएच.डी. आणि १९६४ मध्ये एम.ए. झाले. केंब्रिज विद्यापीठात गणिताच्या ट्रायपॉससाठी शिकत असतानाच १९५९ मध्ये ते ‘रँग्लर’ झाले आणि पुढच्या वर्षी त्यांनी खगोलशास्त्रातील टायसन पदकही मिळविले. १९६२ मध्ये ते महत्त्वाचे मानले जात असलेल्या स्मिथ्स पारितोषिकाचे मानकरी ठरले आणि १९६७ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाचे अॅडम्स पारितोषिक पटकावले.
* १९७६ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची एससी.डी. ही सर्वोच्च पदवी संपादन केली. जयंतरावांचा १९६६ मध्ये मंगला राजवाडे यांच्याशी विवाह झाला. मंगलाताईही गणित विषयात मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी. आहेत. या दांपत्याला गीता, गिरिजा आणि लीलावती या कन्या आहेत.
* डॉ. नारळीकर यांच्या जीवनातील संस्मरणीय घटना म्हणजे पीएच.डी.साठी संशोधन करताना त्यांना लाभलेले फ्रेड' हॉएल यांचे मौलिक मार्गदर्शन. नारळीकरांनी १९६३ मध्ये केंब्रिजमधील किंग्ज कॉलेजमध्ये बेरी रॅम्से फेलो म्हणून प्रवेश केला आणि पुढे ते तेथे सीनियर रिसर्च फेलो झाले. फ्रेड हॉएल यांनी केंब्रिज येथे १९६६ मध्ये स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल अॅस्ट्रॉनामी’ मध्ये नारळीकरांनी १९७२ पर्यंत संस्थापक सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आणि नंतर ते मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
* विद्यापीठ अनुदान मंडळाने १९८८ मध्ये पुणे येथे ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनमी अँड अॅस्ट्रॉफिजिक्स’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे-संस्थापक संचालक म्हणून डॉ. नारळीकर तेव्हापासून ही जबाबदारी सांभाळत आहेत.
* सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र तसेच विश्वरचनाशास्त्र हे डॉ. नारळीकर यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय असून त्यावर त्यांनी अनेक संशोधन-प्रबंध आणि ग्रंथ लिहिले आहेत. या विषयांवरील प्रमाणग्रंथ म्हणून डॉ. नारळीकर यांच्या या लेखनाला जागतिक पातळीवर मान्यता लाभलेली आहे. १९९४-९७ ह्या काळात ते इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल यूनियनच्या कॉस्मॉलजी कमिशनचे अध्यक्ष होते.
* डॉ. नारळीकरांना विज्ञान-संशोधनाच्या क्षेत्रातील अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
** शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक,
** फाय फौंडेशनचे ‘राष्ट्रभूषण’ पारितोषिक,
** बी.एम. बिर्ला पारितोषिक ही त्या पारितोषिकांमधली काही विशेष उल्लेखनीय नावे.
** १९६५ मध्ये राष्ट्रपतींनी डॉ. नारळीकरांना ‘पद्मभूषण’ हा सन्मान प्रदान करून गौरविले.
* मूलभूत संशोधनासमवेत विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यातही डॉ. नारळीकर यांचा सदैव उत्साही सहभाग असतो. या कार्याबद्दल त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार आणि युनेस्कोचा कलिंग पुरस्कार हे दोन महत्त्वपूर्ण गौरव प्राप्त झाले.
* डॉ. नारळीकरांनी मराठीमध्ये लिहिलेल्या विज्ञानविषयक कादंबर्याही समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीच्या मानकरी ठरल्या आहेत. ‘व्हायरस’ या त्यांच्या नव्या कादंबरीला अलीकडेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना सोप्या व रंजक पद्धतीने उकलून दाखवणारे ‘नभात हसरे तारे’हे त्यांचे पुस्तकही ‘राजहंस’ने प्रकाशित केले आहे.
(सहलेखक : अजित केंभवी, मंगला नारळीकर)