डॉ. अरुणा ढेरे ( - इ. स. १९५७) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत.[१]
*** बालपण
अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. लहानपणापासूनच वडिलांचा व्यासंगी श्वास लाभल्याने त्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला, तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली. दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व अभ्यासले.
*** शैक्षणिक अर्हता
* शालेय शिक्षण- नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा मुलींची शाळा पुणे.
* महाविद्यालीय शिक्षण- गरवारे महाविद्यालय आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे.
* १९७७ साली पुणे विद्यापीठात बी.ए. च्या परीक्षेत सर्वप्रथम. सुवर्णपदक आणि अकरा अन्य पारितोषिके प्राप्त.
* १९७९ साली पुणे विद्यापीठात एम.ए. च्या परीक्षेत सर्वप्रथम. सुवर्णपदक आणि तेरा अन्य पारितोषिके प्राप्त.
* १९७७ साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय विद्या पदविकेत सर्वप्रथम. यशवंतराव चव्हाण पारितोषिक प्राप्त.
* १९८६ साली पुणे विद्यापीठात, डॉ.भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास’ (जी.ए.कुलकर्णी आणि चिं.त्र्यं.खानोलकर यांच्या विशेष संदर्भात) या विषयावर प्रबंधलेखन. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त.
* १९८६ साली अमेरिकेत तीन महिन्यांचा कम्युनिकेशन स्टडीजचा अभ्यासक्रम पूर्ण
*** पुरस्कार, सन्मान आणि पदे
* २०१९ साली यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान
* सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
* लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार
* पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार (६ मे २०१६)
* मसाप चा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार - ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला
* मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार (१८-९-२०१७)
* महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी विषयावरील उपयुक्त ग्रंथांची निवड करणाऱ्या ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद (इ.स.२०१७पासून)
* महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे-सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाऊंडेशन, सोलापूर यांच्यातर्फे दत्ता हसलगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार. (२८ जुलै २०१९)