दत्ता बारगजे हे शेतकरी कुटुंबातले. त्यांनी वैद्यकीय पदविका शिक्षण पूर्ण केले आणि ते गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्त झाले. तेव्हा त्या भागात सामाजिक काम करणारे बाबा आमटे यांच्याशी दत्ता बारगजे यांचा संपर्क आला. सामाजिक कामाची कल्पना तेव्हा त्यांच्या मनात रुजली. वेगळे काम करायचे, ही इच्छा होतीच.
दरम्यान, एके दिवशी एक महिला आली आणि म्हणाली, ‘हा (एचआयव्ही) आजार नशिबी आला; पण त्यात माझा आणि या मुलाचा काय दोष? आता जगणं मुश्कील झालं आहे. या मुलाला शिकवू कोठे आणि कसे?’ दत्ता बारगजे यांनी ते मूल स्वत:च्या घरात आणले आणि सांभाळण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनंतर दुसरे मूल आले. पुढे संख्या वाढत गेली आणि घरच भरून गेले. हा संसार कसा सांभाळायचा, असा प्रश्न आला आणि ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेचा जन्म झाला. आता स्थिती अशी आहे, की ही संस्था म्हणजे बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाचा जणू नवा चेहराच झाला आहे.
बीड शहरापासून ११ किलोमीटरवर पाली नावाचे गाव आहे. तेथून दोन किलोमीटर डोंगरावर चढले, की ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेची इमारत दिसते. दत्ता बारगजे यांना सरकारी नोकरी होती. त्यांच्या पत्नी संध्या यादेखील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून तासिका तत्त्वावर काम करायच्या. सुखी संसारासाठी जे सामान्यपणे आवश्यक असते, ते सारे काही दत्ता बारगजेंकडे होते; पण बाबा आमटेंच्या सान्निध्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. हेमलकसा येथे पाच वर्षे सेवा केल्यानंतर सामाजिक कामाची गरज आणि विचारांची परिपक्वता आली होती. उपेक्षितांसाठी काम करण्याची ऊर्मी आणि ‘बाबां’ना दिलेला शब्द पाळायचा, असे बारगजे यांनी ठरविले.
त्यांची भामरागडहून बीड जिल्हा रुग्णालयात बदली झाली. नव्याने काम उभे करायचे, हा विचार पक्का करूनच त्यांनी नोकरीच्या गावावरून बाडबिस्तरा हलविला. एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी काम करण्याचे ठरले. संस्थेची नोंदणी करण्यासाठी कोणाला सदस्य करावे, याची शोधमोहीम हाती घ्यावी लागली. कारण नातेवाइकांनी सदस्य होण्यास नकार दिला. बऱ्याच जणांनी बजावले, की असले विचित्र काम करू नका; पण ते डगमगले नाहीत. पत्नी, आई आणि दोन मित्रांच्या मदतीने त्यांनी २००६ साली ‘इन्फंट इंडिया’ची स्थापना केली.