मूळच्या मुंबईच्या अंबिका नारायण भिडे.
* गिरगावातील शारदा सदन आणि विल्सन महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.
* काही वर्षे एल्फिस्टन आणि नंतर सिडनहॅम महाविद्यालयात त्यांनी निवृत्तीपर्यंत अर्थशास्त्राचे अध्यापन केले.
* लहानपणापासून त्यांच्यावर विविधांगी वाचनाचे संस्कार झाले. त्यातून त्या लेखनाकडे वळल्या. दुसरीकडे भवतालचे भावविश्व त्यांनी कथा-कादंबऱ्यांमध्ये रेखाटले.
* ‘सत्यकथा’, ‘दीपावली’, ‘हंस’ अशा मासिकांमध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. ‘चाहूल’,‘प्रतीक्षा’, ‘एका श्वासाचं अंतर’,‘शांतवन’ आणि ‘अंत ना आरंभही’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
* मोजक्या शब्दांमध्ये अधिकाधिक आशय मांडण्याचा कथालेखनाचा आकृतिबंध त्यांनी आत्मसात केला होता. त्यांच्या पुस्तकांमध्ये मुख्यत्वे स्त्रीप्रधान कथानके आढळतात. मानवी नात्यांच्या पारंपरिक प्रतिमांना छेद देत जगण्याचा प्रयत्न करण्याची त्यांची नायिका वाचकांनाही भावली. त्याबरोबरच स्त्री-पुरूष नातेसंबंधातील वेगवेगळे पैलू त्यांनी मांडले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रगतीची चाहूल लागलेली असताना आधुनिकतेची कास धरू पाहणाऱ्या सुशिक्षित व सुसंस्कृत स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी प्रामुख्याने लेखन केले.