ISBN No: 
978-81-7434-381-9

सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती.
पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे.
एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो.
पद्मविभूषण वसंत गोवारीकर

विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहे.
ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेल?
विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक.
पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते.
अतीश दाभोलकर
(भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक)

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
620
किंमत: 
रु. 400
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
September, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-473-1

अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास
आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय अचूकपणे आणि
रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना
अतिशय उपयोगी ठरेल.
डॉ. भालचंद्र मुणगेकर
माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार

अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं 'अर्थात' एक
इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक
मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून
टाकणारी आहे.
अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी
आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे.
डॉ. डी. एम. नाचणे
डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ
डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ

सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात
संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल
मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका
'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते!
डॉ. अभय पेठे
डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर,
अर्थशास्त्र विभाग, माजी डीन,
फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ

अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली
विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सा-यांसाठीच
गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी,
अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत अन् चरित्रांचा वेध घेणारी
एक रंजक सफर
मराठीत प्रथमच

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2009-10
पृष्ठसंख्या: 
478
किंमत: 
रु. 350
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
March, 2012
ISBN No: 
ISBN 978-81-7434-364-2

‘माझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय.
अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय.
माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम
करीत आलोय.... आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय,
हे माझं अहोभाग्य!
माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं.
आणि ते बघण्यात मी इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय,
पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही.
ईश्र्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे
जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल,
तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव,
पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे
आणि तोही याच मराठी भूमीत दे!’

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2006-07
पृष्ठसंख्या: 
348
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2006
सद्य आवृती: 
January, 2011
ISBN No: 
978-81-7434-686-5

आज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठया लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे समज-गैरसमज पसरवले जातात.
भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणाऱ्या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळयांप्रमाणे नाचवणाऱ्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच!
धर्म-अधर्माचा तात्त्वि काथ्याकूट न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि तशीच अस्वस्थही करून सोडते.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09
पृष्ठसंख्या: 
256
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
November, 2015
ISBN No: 
ISBN 978-81-7434-365-9

मान्यवरांचे काही अभिप्राय
या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा
आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला
आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी
एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे.
- य. दि. फडके

राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या
या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय
पध्दतीच्या मांडणीत!
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे

भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त
कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम'
देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी
वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो.
- कुमार केतकर

मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण
दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून
सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील
निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण
कामगिरी पार पाडली आहे.
- प्रा. जे. व्ही. नाईक

'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष
सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट
लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान
वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.
- रा. ग. जाधव

महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण
मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या
आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला
आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार
ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली,
असा निष्कर्ष काढला आहे.
- सदा डुम्बरे

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2006-07
पृष्ठसंख्या: 
1280
किंमत: 
रु. 1200
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
March, 2009
ISBN No: 
978-81-7434-424-3

कविता हा एक सूक्ष्म जाणिवांच्या तीव्रतर अभिव्यक्तीचा प्रकार आहे.
कवितांच्या मुळाशी अस्वस्थ करणारी संवेदनशीलता असावी लागते.
शिवाय आनंदोत्सवात बुडून जाणारी अनावर इंद्रियजन्यताही लागते. तिची
उपज अनुभवातच असते. नेमकी, संक्षिप्त, सूचक, अमूर्त, अनेकार्थी भाषा
कवितेला लक्षणीय रूप देते. कविता महाजन यांच्या ‘मृगजळीचा मासा’ या
संग्रहातील कविता अस्सल कवितेच्या सगळ्या प्राथमिक अटी पूर्ण
करण्यात बव्हंशी यशस्वी होतात. त्यांचा भावनावेग प्रचंड वेगानं भाषेचा
हिमखंड खेचून आणतो. आणि वाचकांना एकाचवेळी लाव्हारसाचा
आंतरिक दाह नि रक्त गोठवणारी हिमसर्दता अनुभवायला लावतो. त्यांची
कविता स्त्रीवादाच्या सांकेतिक अभिव्यक्तीला उद्ध्वस्त करते आणि
वाचकांना विचारशील बनवते. शिवाय कवितांतल्या उत्स्फूर्त बोधनाच्या,
अंतर्ज्ञानाच्या जागाही दाखवते. निव्वळ भावावेगात अडकून न पडता ती
बुध्दीकडे प्रवास करते आणि वाचकांनाही या प्रवासाची सक्ती करते. यात
सौंदर्याचा तोल ढळू न देण्याची काळजी घेते. विचार हरवत चाललेल्या
आणि प्रतिक्रियांवरच आयुष्य घालवणा-या आपल्या सद्य:कालीन खुरटया
समाजात या कविता विलक्षण झेप घेतात, वाचकांची जाण वाढवतात व
वाचकाची आधिभौतिक भूक भागवण्याचाही प्रयत्न करतात. त्यांचा हा
संग्रह प्रौढ, परिपक्व तर आहेच; समकालीन मराठी कवितेत त्यानं आपलं
स्थानही अढळ केलं आहे.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09
पृष्ठसंख्या: 
128
किंमत: 
रु. 100
सद्य आवृती: 
August, 2008
ISBN No: 
978-81-7434-432-8

हे सारेच जण मोठे कलावंत.

प्रत्येकानं आपल्या कर्तृत्त्वानं कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला.

या कलावंतांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण, त्यांचं योगदान यांचा वेध घेत घेत
रंगभूमीचं प्रयोजन, समाजाच्या अभिरुचीची घडण, सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया यांचाही शोध.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09
पृष्ठसंख्या: 
428
किंमत: 
रु. 325
सद्य आवृती: 
September, 2008
ISBN No: 
ISBN 978-81-7434-465-6

मानवजातीपुढचे आजच्या काळातील
एक प्रमुख आव्हान -
ग्लोबल वॉर्मिंग

रोज आपल्यापर्यंत धडकतात
त्याबद्दलची उलटसुलट मते...
आपला गोंधळ अधिकच वाढवणारी.

या समस्येमागील मूलभूत विज्ञान,
त्याबाबतचे अद्ययावत संशोधन,
या समस्येत अडकलेले राजकारण
अन् अर्थकारण
या सा-यांची आजची स्थिती
उलगडून दाखवणारे पुस्तक.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2009-10
पृष्ठसंख्या: 
170
किंमत: 
रु. 150
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
August, 2012
ISBN No: 
978-81-7434-478-6

मनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल.
लिहावं की लिहू नये? - या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू... म्हणत, कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा
अनेक तऱ्हांनी लेखन केलं.
या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या
डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या.
त्या नोंदींवर आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं
ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं.
लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2009-10
पृष्ठसंख्या: 
200
किंमत: 
रु. 225
प्रथम आवृत्ती: 
2009
सद्य आवृती: 
February, 2010
ISBN No: 
978-81-7434-374-1

अहिल्याबाई होळकर!
जन्म 31 मे 1725.
मृत्यू 13 ऑगस्ट 1795.
ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता,
हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा_
तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळया मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर
ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
पृष्ठसंख्या: 
278
किंमत: 
रु. 250
प्रथम आवृत्ती: 
2007
सद्य आवृती: 
December, 2011