agami_prakashan.gif पहावयास विसरु नका

* * *

प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व राजहंसचे लेखक मिलिंद संगोराम यांचे निधन

sangoram1.jpg

(सौ.सकाळ वृत्तसेवा, रविवार, 18 जानेवारी 2015)

पुणे - येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आणि लेखक मिलिंद संगोराम (वय 47) यांचे शनिवारी (ता. 17) पहाटे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

संगोराम यांनी 1994 पासून पुण्यात आपल्या व्यवसायाला सुरवात केली. अनेक संस्था व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ऑडिटर व प्राप्तिकर सल्लागार म्हणून कार्यरत होते. प्राप्तिकर आणि आंतरराष्ट्रीय करप्रणालीचे ते तज्ज्ञ होते. "ट्रान्स्फर प्रायसिंग‘ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. त्यांनी "सकाळ‘, "सकाळ साप्ताहिक‘ व अन्य नियतकालिकांमधून सातत्याने विपुल लेखन केले. "बखर भारतीय प्राप्तिकराची‘, इन्कम टॅक्‍सविषयी सारे काही‘, "अशी करा गुंतवणूक, असा वाचवा प्राप्तिकर‘ अशी अभ्यासपूर्ण पुस्तकेही त्यांनी लिहिली. यातील "बखर भारतीय प्राप्तिकराची‘ यासाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. छायाचित्रण, साहित्य, संगीत, नाटक यांसारख्या विविध विषयांतही त्यांना रस होता.

अजातशत्रू अन्‌ उत्साहाचा झरा
मुकुंद लेले
(सौ. सकाळ, रविवार, 18 जानेवारी 2015)

सतत नवनव्या बातम्यांच्या विश्‍वात वावरत असूनही गेल्या काही दिवसांपासून जी बातमी आपल्यापर्यंत कधीच पोचू नये असं वाटत होतं, ती बातमी अखेर शनिवारच्या मध्यरात्री "एसएमएस‘च्या माध्यमातून थडकलीच आणि काळजाला चर्रर झालं. प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट, "सकाळ‘चा निष्ठावान लेखक आणि माझ्यासारख्या अनेकांचा मित्र- मिलिंद संगोराम अर्ध्यावरच डाव सोडून, सर्वांनाच धक्का देत सोडून गेलेला होता... एक तपाहून अधिक काळ ज्याच्याशी मैत्रीच्या पलीकडचे संबंध होते, तो मिलिंदा आज आपल्याबरोबर नाही, हे मनाला अजूनही पटत नाही. "मित्र भावासारखा असावा अन्‌ भाऊ मित्रासारखा असावा, म्हणजे नातं छान फुलतं,‘ असं म्हणतात. मिलिंदाच्या बाबतीत माझं असंच होतं. आज सख्ख्या भावासारखा मित्र गमावल्याची भावना मनावर खोल आघात करून गेलीय. तो फक्त सीए किंवा लेखक नव्हता, त्यापलीकडं माणूस म्हणून त्याचं वागणं, बोलणं, दुसऱ्याला क्षणार्धात आपलसं करणं हे शब्दांच्या पलीकडचं होतं... अलौकिक होतं... त्यामुळंच आज त्याच्याविषयीची ही दुःखद बातमी समजल्यावर अनेकांनी ज्या शब्दांतून हळहळ व्यक्त केली, त्यावरून त्याचं मोठेपण, माणूसपण अधिकच अधोरेखित होतं. सदैव उत्साही, आनंदी, समोरच्याला मदत करण्यासाठी तत्पर असणारा अजातशत्रू मिलिंदा इतक्‍या अकाली, अनपेक्षितपणे सोडून जाईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

सदाशिव पेठेतील छोटेखानी ऑफिसची जागा कमी पडायला लागली म्हणून त्यानं उत्साहानं सिंहगड रस्त्यावर नवी जागा घेतली, तितक्‍याच उत्साहानं, जातीनं लक्ष घालून ते सजवलंही. माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना पुरेशी बसायला जागा नाही, अशी खंत तो बोलून दाखवायचा; पण या नव्या ऑफिसमध्ये काम करण्याचं बहुधा त्याच्या नशिबात नव्हतं. फारच कमी दिवस तो तिथं बसू शकला. एका आजारामुळं त्याला दिवाळीच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं, हे जेव्हा समजलं, तेव्हाच खरंतर धक्का बसला होता. तेव्हापासून त्याच्या प्रकृतीत सतत चढ-उतार होत होते. त्याला भेटायला गेल्यावर तो तितक्‍याच आत्मीयतेनं बोलायचा, आपल्याला काहीही झालेलं नाही, असं तो दाखवून द्यायचा; पण हॉस्पिटलमधला आपला मुक्काम फारच वाढत चाललाय, ही सल त्याला बोचत होती... तसं त्यानं बोलूनही दाखवलं होतं... सतत धावपळीत असणारा, कामात व्यग्र असणारा मिलिंदा आपल्या आजाराशी लढा देत सुमारे अडीच-तीन महिने हॉस्पिटलमध्ये जखडून पडलेला पाहणं हे खरोखरच वेदनादायी होतं. मी त्याला म्हणायचो, "अरे आमच्या लेखकांच्या टीममधला तू तर आघाडीचा बॅट्‌समन. तुझ्याविना मॅचला मजा येत नाही, तेव्हा लवकर बरा हो, पुन्हा तुझ्याकडून लेख कधी मिळतायत, याची मी वाट पाहतोय.‘ त्यावर तोही म्हणायचा, "अरे हो ना, नव्या वर्षात मी घरी असेन आणि तुला नक्की लेख पाठवेन.‘ बोलल्याप्रमाणे, मिलिंदानं शब्द पाळला (जसा तो नेहमीच पाळायचा). एके दिवशी त्याचा फोन आला अन्‌ "दोन लेख लिहून तयार झालेत, तुझ्याकडे पाठवायची व्यवस्था करतो,‘ असं तो म्हणाला. काही दिवस वाट पाहूनही लेख न मिळाल्यानं मी सहज चौकशी केली, तर त्याला पुन्हा ऍडमिट केल्याचं कळलं. पुन्हा आजाराशी सामना सुरू झाला. काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा होत असून, तो लवकरच कामालाही सुरवात करणार असल्याचं समजलं आणि खूप मोठा दिलासा मिळाला. मात्र, तीन-चार दिवसांपूर्वी त्याला पुन्हा श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्याला "आयसीयू‘तच दाखल करावं लागलं. जन्मापासूनच मिलिंदाचं आयुष्य चमत्कारिक किंवा आश्‍चर्यकारक घटनांनी भरलं असल्याचं त्याच्या मामांकडून समजलं होतं. या वेळीही असाच काहीतरी चमत्कार घडेल अन्‌ मिलिंदा या संकटातूनही बाहेर पडेल, असं मनातून सतत वाटायचं; पण नियतीला ते मान्य नसावं... आणि "जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला,‘ याचा अनुभव मिलिंदच्या जाण्यानं सर्वांनाच नाईलाजानं घ्यावा लागला.

मिलिंदा व्यवसायानं सीए असला तरी प्राप्तिकर अर्थात सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या इन्कम टॅक्‍सची तो प्रामुख्यानं प्रॅक्‍टिस करायचा. त्यातलं त्याचं अद्ययावत ज्ञान चकीत करणारं असायचं. त्याच्या विषयात एखादी नवी गोष्ट घडली, की तो लगेच कळवायचा. "ही माहिती लोकांपर्यंत जायला हवी रे मुकुंद,‘ असं तळमळीनं सांगून शक्‍य तितक्‍या लवकर लेख लिहून पाठवायचा. झपाटल्यागत लिखाण करणं हेच त्याचं "व्यसन‘ होतं, असं मला वाटतं. शुद्ध मराठीत लेखन, लिखाणातली स्पष्टता, आपला विषय सोदाहरण पटवून सांगण्याचं कौशल्य हे वादातीत होतं. योग्य शीर्षकासह, चपखल शब्दांचा वापर करून लिहिलेले त्याचे लेख मी इतरांना नमुना म्हणून नेहमीच दाखवत असे. कमीतकमी संपादन आणि दुरुस्तीसह त्याचा लेख छापून यायचा. त्यात केलेल्या बारीकसारीक बदलांची नोंद घेऊन त्याबद्दल आभार मानण्याचे औदार्यही तो तितक्‍याच खुल्या मनानं दाखवायचा. या सर्वांतून वेळ काढून त्यानं "बखर भारतीय प्राप्तिकराची‘, "इन्कमटॅक्‍सविषयी सारे काही‘ अशी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली. रोजच्या व्यापातून तो या सर्वांसाठी वेळ कधी काढत असेल, असा प्रश्‍न मला नेहमी पडायचा; पण आवड असली की सवड मिळते असं म्हणतात, तसंच काहीसं त्याचं होतं. "पहाटे लवकर उठून मी लिखाण करतो, कारण त्या वेळी डिस्टर्ब करायला कोणी नसतं,‘ असं तो म्हणायचा. कितीही कामात असला तरी तो चिडलेला, कोणावर संतापलेला मी पाहिलेला नाही. सर्वसामान्य वाचक, इतकेच नव्हे तर अनेक सीए मंडळी, प्राप्तिकर खात्यातले अधिकारीही मिलिंदाचं मार्गदर्शन घेत असत. आपली फी किंवा पैसा याला तो कधीच महत्त्व द्यायचा नाही. "आपल्या ज्ञानामुळं कोणालातरी फायदा होतोय ना, मग झालं,‘ असं बोलून तो विषय बदलायचा. त्याचमुळं आज मिलिंदाचं असणं आणि नसणं, यात किती अंतर आहे, हे त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांना नक्कीच जाणवणारं असेल, हे नक्की!

* * *

DGM-SAI2.jpg
शकुंतलाबाईंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून "मायलेकीं‘च्या या पुस्तक प्रकाशनाचा संकल्प एका अनौपचारिक सोहळ्यात सोडण्यात आला. त्या प्रसंगी सई परांजपे व "राजहंस‘चे दिलीप माजगावकर.

सई परांजपे यांचे आत्मकथन पुस्तकरूपात
(सौ.सकाळ वृत्तसेवा, रविवार, 18 जानेवारी 2015)

पुणे - ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांनी लिहिलेल्या स्वतःच्या आयुष्यातील आठवणींचा पट उलगडणारे आत्मकथन लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे परांजपेंच्या आई, व्यक्तिस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या व आपल्या समाजकार्याने समाजापुढे नवा आदर्श उभा केलेल्या विदुषी शकुंतला परांजपे यांच्या लेखनाचे "निवडक शकुंतला परांजपे‘ हे पुस्तकही पुनर्मुद्रणाच्या रूपात प्रसिद्ध होणार आहे. शकुंतलाबाईंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून "मायलेकीं‘च्या या पुस्तक प्रकाशनाचा राजहंस प्रकाशनने संकल्प सोडला आहे.

एका अनौपचारिक सोहळ्यात शनिवारी सई परांजपे यांच्या उपस्थितीत हा संकल्प सोडण्यात आला. या वेळी "राजहंस‘चे दिलीप माजगावकर, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, पत्रकार दिलीप पाडगावकर, अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अभिनेते श्रीराम रानडे, विनया खडपेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात परांजपे यांनी शकुंतलाबाईंवर लिहिलेल्या एका लेखाचे अभिवाचन केले, तर शकुंतलाबाईंच्या "माझी प्रेतयात्रा‘ या ललितलेखाचे अभिवाचन सुदर्शन आठवले यांनी केले.

आई एक मनस्वी अन्‌ वेगळ्या वाटेवरून चालणारी स्त्री होती. तिने मला लहानपणी शिकवलेल्या अनेक गोष्टींची शिदोरी मला आजपर्यंत पुरतेय. माणुसकीचा मोठा धडा तिनेच मला दिला. आज तिचं लेखन पुनर्मुद्रित होणार, याचा मला खूप आनंद आहे.

- सई परांजपे, ज्येष्ठ दिग्दर्शक

spacer.jpg

राजहंस प्रकाशनाशी संबंधित हस्तलिखिते आणि इतर साहित्यविषयक बाबींसाठी
rajhansprakashaneditor@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा.

राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची मागणी, नोंदणी अथवा योजनेबाबत माहिती घेण्यासाठी
rajhansprakashaninfo@gmail.com या पत्त्यावर ई-मेलने संपर्क साधावा.